मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर पोलिसांनी धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत मोक्का गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. तब्बल अडीच तास सुरू असलेल्या या थरारक कारवाईत एक आरोपी मात्र पोलिसांना चकवा देत फरार झाला. आरोपींकडून धारदार शस्त्रे, मोबाईल फोन आणि कार असा एकूण २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या अमोल परात्या भोसले याच्याविरुद्ध राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी दुपारी रिसोड–सोनाटी मार्गाने मेहकर बायपासकडे काही अट्टल गुन्हेगार लाल रंगाच्या एमएच-३१-एफए-५८२० क्रमांकाच्या कारने येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना मिळाली. माहितीची पडताळणी होताच त्यांनी पथकासह बायपासवर नाकाबंदी केली.
काही वेळातच संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. कारच्या मागील काचेवर ‘जगदंब’ असे लिहिलेले होते. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला; मात्र चालकाने वेग वाढवत नाकाबंदी तोडली आणि सारंगपूर–बरटाळा मार्गाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. तब्बल दोन ते अडीच तासांच्या थरारक पाठलागानंतर गणपूर फाट्याजवळ पोलिसांनी कार अडवून आरोपींना घेरले.
कार थांबताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून अमोल परात्या भोसले (वय २५, रा. वरटाळा, ता. मेहकर) आणि अजय दहीमल भोसले (वय २६, रा. वरदडा-लोणी लव्हाळा, ता. मेहकर) या दोघांना ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता कारमधून तीन धारदार सुरे, एक ऑटोमॅटिक चाकू, मोबाईल फोन तसेच कार असा एकूण २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान अमोल परात्या भोसले हा गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध मेहकर, खामगाव ग्रामीण, लोहा (नांदेड), अहमदपूर (लातूर) आणि सिसोड (वाशीम) या पोलीस ठाण्यांत खूनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र कायद्याचे उल्लंघन तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी परतापूर, उकळी आणि सुकळी परिसरात पोलिसांनी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडून आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, सपोनि संदीप विरांजे, सपोनि प्रदीपकुमार राठोड, पोउपनि किरण खाडे, एएसआय सुखदेव गव्हाणे तसेच मेहकर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या धाडसी कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.















