जिल्ह्यात ५७६ वाहनांवर कारवाई; ६.७२ लाखांचा दंड, एसटीच्या उत्पन्नात तब्बल….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):एसटी बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर जिल्हा प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन क्लीन’ अंतर्गत एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापुढे या परिसरात नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आढळल्यास केवळ दंडच नव्हे, तर थेट वाहन जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
‘ऑपरेशन क्लीन’चा पहिला टप्पा ५ जून ते १५ जून दरम्यान राबविण्यात आला. या कालावधीत ३०६ खाजगी वाहनांवर कारवाई करून सुमारे ४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर १ जुलै ते १० जुलै या कालावधीत दुसरा टप्पा अधिक आक्रमकपणे राबविण्यात आला. या टप्प्यात २७० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून २ लाख ७२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार तसेच पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने संयुक्तपणे केली.
एसटीच्या उत्पन्नात ७४ लाखांची वाढ….
अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश आल्याने एसटी महामंडळालाही मोठा फायदा झाला आहे. या विशेष मोहिमेनंतर बुलढाणा विभागातील एसटीच्या उत्पन्नात तब्बल ७४ लाख रुपयांची वाढ नोंदविण्यात आली असून प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच
एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी वाहन उभी करून प्रवाशांची चढ-उतार करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध आता थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अवैध ट्रॅव्हल्स आणि ऑटो वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आणि अधिकृत प्रवासासाठी एसटी सेवेचाच वापर करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.













