मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): १ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मलकापूर शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील छत्तरपूर बारी तालुक्यातील हराई पंचायत येथील रहिवासी प्रकाशचंद गोरीलाल कुशवाह (वय ३०) यांनी याबाबत तक्रार दिली. फिर्यादीनुसार, ९ जुलै रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता मलकापूर शहरातील चाळीसबिगा परिसरात दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना ‘१ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपये देतो’ असे खोटे आमिष दाखविले.
या आमिषाला बळी पडलेल्या फिर्यादीकडून आरोपींनी ८० हजार रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांनी ‘बच्चो की बँक’ असे लिहिलेल्या बनावट नोटांचे बंडल देऊन घटनास्थळावरून पलायन केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने मलकापूर शहर पोलिसांत धाव घेतली.
तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ नोंदवत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) व ३(५) अन्वये दोन अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.















