चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील काळोणा हे गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत होते. गावाचे नाव अधिकृत नकाशावर नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांमध्ये होती. मात्र गेल्या एक वर्षांपासून गावाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलन करून गावाच्या विकासाचा मुद्दा जिवंत ठेवण्यात आला.
गावातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी सातत्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. विविध माध्यमांतून आंदोलन करून तसेच ग्रामस्थांना एकत्र आणून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी अनेकांनी तोंडी पाठिंबा दिला, मात्र काही मोजक्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून लढा दिला.
दरम्यान, सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या वतीने दराडे सर यांनी काळोणा गावाला भेट देत स्मशानभूमीच्या कामाचे उद्घाटन केले. यावेळी गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून स्मशानभूमीसाठी ५ लाख रुपये आणि गावापासून ते स्मशान भूमी पर्यंत रस्त्याच्या कामासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी चिखली तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गायकवाड यांनीही गाव दत्तक घेत असल्याची घोषणा केली. गावातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि विविध प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “गावातील कोणतीही समस्या असेल तर थेट माझ्याकडे या, ती सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येतील,” असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर आणि विशाल थुट्टे आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा सपकाळ या तिघांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच स्मशानभूमी व रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावकऱ्यांनी या तिघांचे स्वागत करताना, “हे केवळ पुढारी नाहीत तर मातीशी नाळ जुळलेले आणि गावासाठी झटणारे खरे लोक आहेत,” अशा शब्दांत कौतुक केले.
स्मशानभूमी उद्घाटन कार्यक्रमाला दराडे सर, नायब तहसीलदार गायकवाड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल थुट्टे, सामाजिक नेते संतोष आटोळे, सरपंच मल्लूशेठ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासाला आता प्रत्यक्ष गती मिळणार असल्याने काळोणा परिसरात आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.















