बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार वेगवेगळ्या मृत्यूंच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. गळफास, उंचावरून पडणे तसेच आकस्मिक मृत्यू अशा विविध प्रकारांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी मर्ग नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तारापूर (कोथळी) येथील बजेशींग ईश्वरसिंग चव्हाण (वय ४२) यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली. १ एप्रिल रोजी सकाळी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
दुसरी घटना सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरखेडी बावरा येथे घडली. शामल रमेश शेरे (वय १६) ही अल्पवयीन मुलगी घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २९ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला.
तिसरी घटना बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजूर येथे घडली. सय्यद अजिम सय्यद अन्वर (वय ३८) यांना २५ मार्च रोजी बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चौथी घटना शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनोकार कंपाऊंड परिसरात उघडकीस आली. प्रवीण बबनराव शेंडगे (वय ४३) यांचा आकस्मिक मृत्यू झाला असून नातेवाईकांनी त्यांना मृत अवस्थेत रुग्णालयात नेले होते.
वरील सर्व घटनांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला असून, मृत्यूची कारणे स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.














