जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातून ट्रॅक्टर नेल्यामुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान होत असल्याचा जाब विचारला, तर थेट ट्रॅक्टरने उडवून खल्लास करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथे समोर आला आहे. या घटनेमुळे शेतातील पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सावरगाव येथील ५९ वर्षीय शेतकरी बाळकृष्ण दयाराम दाभाडे यांच्या शेतातून ट्रॅक्टर नेण्यावरून २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाद झाला. ऋषिकेश रामेश्वर सातव आणि उद्धव श्रीराम सातव या काका-पुतण्यांनी शेतातून ट्रॅक्टर नेल्यामुळे कपाशी पिकाचे नुकसान होत असल्याचे दाभाडे यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र, यावरून वाद वाढल्याचा आणि संबंधितांनी शिवीगाळ करत ट्रॅक्टरने उडवून खल्लास करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करत बाळकृष्ण दाभाडे यांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात २७ ऑक्टोबर रोजी एनसीआर क्रमांक ०९३०/२०२६ नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारीत उद्धव श्रीराम सातव, श्रीराम पुंडलिक सातव, ऋषिकेश रामेश्वर सातव आणि अरुण ज्ञानदेव दाभाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोप तक्रारीवर आधारित असून, त्याबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.












