मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिंपरी आंधळे येथील ४० वर्षीय महिला घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली. निर्मला रामप्रसाद आंधळे असे बेपत्ता महिलेचे नाव असून, त्यांचे पती रामप्रसाद भगवान आंधळे (वय ४५) यांनी २८ ऑक्टोबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, निर्मला आंधळे या २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घरातून निघून गेल्या. मात्र, त्या बराच वेळ होऊनही घरी परतल्या नाहीत. नातेवाइकांनी व परिचितांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
बेपत्ता महिलेचा रंग गोरा, बांधा सडपातळ आणि उंची अंदाजे पाच फूट आहे. घरातून निघून जाताना त्यांच्या अंगात पिवळ्या रंगाची साडी व पिवळ्या रंगाचे ब्लाउज होते. त्यांच्या पायांत जोडवे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी नोंद घेतली असून, ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सदर महिला कोणाला दिसून आल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास अंढेरा पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.













