चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली बसस्थानकात बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) दुपारी चार वाजेच्या सुमारास बसचा धक्का लागल्याने सुमारे ७५ वर्षीय महिला बसखाली आल्याची घटना घडली. या अपघातात महिलेचा हात बसच्या चाकाखाली सापडल्याने त्या जखमी झाल्या. निर्मला आनंदराव देशमुख (रा. धोत्रा भंगोजी, ता. चिखली) असे जखमी महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी येथून शेगावकडे जाणारी बार्शी आगाराची बस (क्रमांक.MH14LX5064) चिखली बसस्थानकात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. बसचा धक्का लागल्यानंतर निर्मला देशमुख बसखाली आल्या आणि त्यांचा हात बसच्या चाकाखाली सापडला. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयएमचे माजी शहराध्यक्ष शेख शमशेर आणि कपिल लोखंडे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोघांनीही जखमी महिलेला बसखालून बाहेर काढून उपचारासाठी जवंजाळ हॉस्पिटल येथे दाखल केले.
या घटनेमुळे चिखली बसस्थानकातील प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बसस्थानकात बसची सतत ये-जा सुरू असते, तर दुसरीकडे प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत बसचालकांनी अधिक काळजी घेण्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.












