Advertisement Advertisement

अरे बापरे! मुलावरचा राग सोयाबीनवर काढला!मुलानं सोयाबीन विकलं म्हणून बापानं सुडी पेटवली;डोळ्यादेखत कष्टाची कमाई जळून खाक! एकलारा गावात खळबळ; वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलाने आपल्याला न विचारता सोयाबीन विकल्याच्या रागातून पित्याने स्वतःच्याच शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लावल्याची धक्कादायक घटना एकलारा येथे घडली. या आगीत सुमारे तीन लाख रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकलारा येथील शेतकरी गणेश उद्धव अंभोरे (वय ३८) हे २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरी होते. त्याचवेळी त्यांचे मित्र गजानन अंभोरे यांचा त्यांना फोन आला. तुमचे वडील उद्धव पांडुरंग अंभोरे यांनी शेतातील सोयाबीनच्या सुडीला आग लावल्याचे मित्राने सांगितले. ही माहिती मिळताच गणेश अंभोरे यांना धक्का बसला.

दरम्यान, मुलाने आपल्याला न विचारता सोयाबीन विकल्याच्या कारणावरून वडील उद्धव अंभोरे नाराज होते. याच रागातून त्यांनी सोयाबीनच्या सुडीला आग लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आगीत शेतातील सोयाबीन जळून खाक झाले असून, गणेश अंभोरे यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेप्रकरणी गणेश अंभोरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार २७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास वडील उद्धव पांडुरंग अंभोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कौटुंबिक वादातून शेतातील कष्टाची कमाई जळून खाक झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!