मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या रॅकेटवर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. २७ जून रोजी पीसीपीएनडीटी (PCPNDT) पथकाने मेहकर पोलिसांच्या मदतीने परतापूर येथे छापा टाकून पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान करणाऱ्या एका बोगस डॉक्टरला रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
. जाहिरात 👆
आरोग्य विभागाला परतापूर येथील एका घरात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (२७ जून) सकाळी ६ वाजल्यापासून पथकाने संशयितांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली. योग्य वेळ साधत दुपारी मेहकर पोलिसांच्या मदतीने संबंधित घरावर अचानक छापा टाकण्यात आला. त्यावेळी बोगस डॉक्टर गर्भलिंग निदान करताना रंगेहात सापडला.
मेहकर तालुका हा जिल्ह्याच्या टोकाला असल्याने या परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. यापूर्वी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या कारवाईत मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील आरोपीचा सहभाग समोर आला होता. तसेच डोणगाव परिसरातही अशा प्रकारच्या कारवाया यापूर्वी झाल्या आहेत. त्यामुळे या रॅकेटची पाळेमुळे मेहकर परिसरात खोलवर रुजल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजातील स्त्री-पुरुष गुणोत्तर बिघडवणारे गंभीर सामाजिक गुन्हे आहेत. आरोग्य विभागाच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, अशा रॅकेटचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई, सातत्यपूर्ण जनजागृती आणि समाजाच्या सक्रिय सहभागाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.















