चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील गांधीनगर परिसरात लग्नाच्या आनंदावर विरजण घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ मे रोजी विवाह ठरलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने मेहंदी कार्यक्रमानंतर पहाटेच घरातून गायब झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधीनगर येथील रोमा गोलानी हिचा विवाह १३ मे रोजी होणार होता. त्यानिमित्त १० मेच्या रात्री कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच ११ मेच्या पहाटे रोमा अचानक घरातून निघून गेल्याचे उघड झाले.
कुटुंबीयांनी सकाळी शोध घेतला असता ती घरात नसल्याचे लक्षात आले. तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद लागत होता. त्यामुळे नातेवाईकांची चिंता आणखी वाढली.
दरम्यान, रोमा ही गांधीनगर परिसरातीलच सागर चव्हाण नावाच्या तरुणाशी सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ती त्याच्यासोबतच घरातून निघून गेली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे लग्नघरात एकच गोंधळ उडाला असून नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मेहंदीचा रंग हातावर ताजा असतानाच नवरी बेपत्ता झाल्याची चर्चा सध्या संपूर्ण चिखली शहरात रंगली असून, “मांडवातून नवरीची एक्झिट” हा विषय नागरिकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.













