धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोमवारची पहाट धाडवासीयांच्या काळजात धस्स करणारी ठरली. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना ६ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेत तीन लहान बहीण-भावांचा मृत्यू झाला असून आईसह एका मुलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४), मशीरा मोहंमद वसीम जमदार (वय ७) व फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८) या तीन चिमुकल्या भावंडांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४) व अश्मिरा वसीम जमदार (वय ३) यांच्यावर बुलढाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारीपासूनच संबंधित कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. सोमवारी सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अली व मशीरा यांचा मृत्यू झाला, तर सायंकाळी उपचार सुरू असताना फातिमानेही प्राण सोडले. अश्मिराची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पंचक्रोशीत शोककळा…
या घटनेमुळे धाडसह पंचक्रोशीतील गावांवर शोककळा पसरली आहे. जमदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुःखद अंत्यविधी…
सकाळी मृत्यू झालेल्या अली व मशीरा यांचे शवविच्छेदन करून दुपारी पार्थिव घरी आणण्यात आले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आई अफरीन या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्या आपल्या मुलांचे शेवटचे दर्शन घेऊ शकल्या नाहीत. वडील वसीम यांची अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती.
कारण अद्याप अस्पष्ट…
विषबाधा नेमकी कशामुळे झाली याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.













