Advertisement Advertisement

मेहकरमध्ये शिक्षकाचा राडा! मुख्याध्यापकांच्या घरासमोर दारूच्या नशेत धमक्या…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या गुरु-शिष्य नात्याला तडा देणारी धक्कादायक घटना मेहकर येथे घडली आहे. निलंबित करण्यात आलेल्या एका शिक्षकाने दारूच्या नशेत मुख्याध्यापकांच्या घरासमोर जाऊन अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी फिर्यादी उत्तम वामन खोडके (वय ५२), मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा चिंचोली बोरे यांनी मेहकर पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी शिक्षक दामोदर प्रभाकर अंभोरे याला त्याच्या गैरवर्तणुकीमुळे पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. याचाच राग मनात धरून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता आरोपी अंभोरे दुचाकी (एमएच-२८-बीयु-३०८७) वरून संभाजी नगर येथील मुख्याध्यापक खोडके यांच्या घरासमोर पोहोचला. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. “मला निलंबित करण्याचा अधिकार तुला कोणी दिला?” असा जाब विचारत त्याने भररस्त्यात आरडाओरडा करत अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केली व “तुला पाहून घेईन” अशी धमकी दिली.

मुख्याध्यापक खोडके यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत निलंबन आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे सांगितले, मात्र आरोपीने संतापाच्या भरात शिवीगाळ सुरूच ठेवली.

या प्रकरणी मेहकर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३५१ (२) तसेच मद्यप्राशनाशी संबंधित कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुखदेव ठाकरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!