मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोशल मीडियावरील ओळखीतून संपर्क वाढल्यानंतर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार मोताळा तालुक्यातील धा. बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. मुलीला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणी सारोळापीर येथील १९ वर्षीय युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारोळापीर येथील संदेश समाधान तायडे (वय १९) याची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मोबाईलवरून फोन तसेच मेसेजद्वारे नियमित संपर्क सुरू झाला. या ओळखीतून आरोपीने १० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता मुलीच्या घरी जाऊन तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर सुमारे १५ दिवसांनी पुन्हा असाच प्रकार घडल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.
दरम्यान, काही काळानंतर मुलीला सतत ताप आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. मागील दोन महिन्यांपासून हा त्रास सुरू असल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी संदेश समाधान तायडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(२)(M), ६५(१), ३३३ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा अर्थात पोक्सोच्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धा. बढे पोलीस करीत आहेत.
सोशल मीडियावरील ओळखींबाबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज…..
या घटनेमुळे सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी होणाऱ्या ओळखी आणि अल्पवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुलांनी ऑनलाइन संवाद साधताना सावध राहणे, तर पालकांनी मुलांशी विश्वासपूर्ण संवाद ठेवून त्यांना ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागरूक करणे आवश्यक आहे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये पीडित अल्पवयीन मुलीची ओळख आणि गोपनीयता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.













