बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात जिल्ह्यातील एकूण ९,१२४ मतदारांपैकी ८,२८० शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात ९०.७५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख चार उमेदवार असल्याने लढत चुरशीची झाली आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक, काँग्रेसकडून आदिती पोहरे, शिक्षक भारतीकडून सुरेश देवकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी स्थानिक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदानाचा कल कोणाच्या बाजूने राहिला, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, केवळ बुलढाणा जिल्ह्यातील मतदानाच्या जोरावर उमेदवाराच्या विजयाचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही.
अमरावती शिक्षक मतदारसंघात बुलढाण्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचाही समावेश असल्याने या जिल्ह्यांतील मतदानाचा कलदेखील निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांतील मतदानाची आकडेवारी आणि मतदारांचा कौल समोर आल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाचा पुढील आमदार कोण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.













