Advertisement Advertisement

शेताच्या बांधावर बसला होता, चुलत भाऊ मागून आला! कुऱ्हाडीच्या तुंब्याचा वार अन् डोक्यातून रक्त!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पंपळखुटा शिवारात शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून चुलत भावाने शेतकरी भास्कर लक्ष्मण घुगे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तक्रारीनुसार, भास्कर घुगे यांच्या गट क्रमांक ६४ मधील शेतालगत विहिरीसाठी आडवे बोअर घेण्याच्या कारणावरून त्यांचा चुलत भावासोबत यापूर्वी वाद झाला होता. मात्र, गावातील पंचांसमक्ष चर्चा झाल्यानंतर हा वाद मिटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भास्कर घुगे हे आपल्या शेताच्या बांधावर बसलेले असताना त्यांचा चुलत भाऊ मागून आला. त्याने शिवीगाळ करून हातातील कुऱ्हाडीच्या तुंब्याने डोक्यावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वारामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच आरोपीने फेकलेला दगड डाव्या हाताच्या अंगठ्याला लागल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. यावेळी आरोपीने मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

घटनेनंतर भास्कर घुगे हे आपल्या मुलासह सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचारानंतर १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली.

या तक्रारीवरून सिंदखेड राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासानंतर घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!