मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील कोथळी येथील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शौचाला जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली ही तरुणी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, ती मिळून न आल्याने याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणी मोताळा येथील साई अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करत होती. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती शौचाला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
याप्रकरणी तरुणीच्या २३ वर्षीय भावाने बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपल्या बहिणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय त्याने फिर्यादीत व्यक्त केला आहे.
बेपत्ता तरुणीचा रंग सावळा असून तिचा बांधा मजबूत आहे. ती घरातून निघाली तेव्हा तिने निळ्या रंगाचा फ्रॉक, निळ्या रंगाची लेंगी आणि पायात गुलाबी रंगाच्या चप्पला घातल्या होत्या. या वर्णनावरून तिचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.













