मलकापूर/धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मलकापूर येथे एका तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपविले, तर चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, मलकापूर शहरातील दुर्गानगर बारादरी भागातील रहिवासी तथा नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी किशोर रामभाऊ पाटील यांचे पुत्र गोपाल किशोर पाटील (वय ४०) यांनी ६ मे रोजी दडाचा मारोती परिसरातील स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या दरम्यान शेजारच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर घटना उघडकीस आली.
यानंतर त्यांचा मृतदेह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, कर्जबाजारीपणामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, दुसरी घटना चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे घडली. येथील भानुदास दशरथ कोल्हे (वय ४६) यांनी मंगळवारी दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री जेवण करून मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या आईच्या निदर्शनास ही घटना आली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नापिकी, बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, पेरणीसाठी निर्माण झालेली आर्थिक अडचण, पीकविमा न मिळणे तसेच कर्जमाफीच्या प्रतीक्षेमुळे ते मानसिक तणावात होते. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक तसेच खासगी सावकारांचे कर्ज असल्याचेही सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.













