मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच आज, २३ जून रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३२६.५ जवळ आणखी एक भीषण अपघात घडला. भरधाव फॉर्च्यूनर कारने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी, मुलगा आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर (वय ५२) आणि त्यांची पत्नी गुलसितानबी सय्यद आसिफ (वय ४५) यांचा समावेश आहे. तर नबा सय्यद आसिफ (वय १८), सय्यद अजब माज सय्यद आसिफ (वय २५) आणि चालक शेख साजिद शेख फरीद हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील ट्रक चालक मोहम्मद इजराउल हक हा ट्रक (क्रमांक NL-01 AD-4981) घेऊन नागपूरहून मुंबईकडे जात होता. त्याच मार्गावरून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सय्यद आसिफ हे आपल्या कुटुंबासह फॉर्च्यूनर (क्रमांक MH-20 HN-6768) कारने प्रवास करत होते. मुंबई कॉरिडॉरवरील मध्यम लेनमध्ये धावणाऱ्या ट्रकला फॉर्च्यूनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सोळंके यांच्यासह आरख, राठोड, चौधरी, शेख नासिर आणि बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना व मृतांना बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
गंभीर जखमी असलेल्या दोन्ही मुलांवर व चालकावर प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.













