अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) अंढेरा परिसरातील मेरा बुद्रुक गावात मुख्य बसस्टॉपजवळील एका विहिरीत ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार, २२ जून रोजी सकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंढेरा पोलिसांकडून व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव बिस्मिल्लाबी मोहम्मद हनिफ (वय ६५, रा. मेरा बुद्रुक) असे आहे. त्यांचे पुत्र व सुना हे उच्चशिक्षित असून जालना येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे बिस्मिल्लाबी या बहुतांश काळ मुलांकडे राहत होत्या. मात्र, गेल्या आठ दिवसांपूर्वी त्या पतीसोबत राहण्यासाठी मूळ गावी मेरा बुद्रुक येथे आल्या होत्या.
दरम्यान, सोमवारी सकाळी गावातील मुख्य बसस्टॉपजवळ असलेल्या पक्क्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब गावाचे कोतवाल सचिन पडघान यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अंढेरा पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे, दुय्यम ठाणेदार घुगे तसेच पोलीस कर्मचारी फुसे, किशोर जाधव आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला.
या घटनेमागे नेमके कारण काय, हा अपघाती मृत्यू आहे, आत्महत्या आहे की अन्य काही घातपात, याबाबत विविध चर्चा गावात सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे….
















