बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल ५१ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांचा समावेश असून, नव्या अधिकाऱ्यांकडे संबंधित ठाण्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
किचकट आणि क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासासाठी ओळखल्या जाणाऱ्या अंढेरा पोलिस ठाण्याचे नवे ठाणेदार म्हणून दिपक ढोमणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान ठाणेदार रुपेश शक्करगे यांची सीसीटीएनएस कक्षात बदली करण्यात आली आहे.
अमडापूर पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी जयसिंग राजपूत, तर धामणगाव बढे येथे निखिल निर्मल यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीबी पोलिस ठाण्याचे विद्यमान ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची क्यूआरटी (QRT) पथकाचे प्रमुख म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी गजानन पिराजी सोनटक्के यांच्याकडे बीबी पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय, साखरखेर्डा पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी युवराज रबडे, जलंब येथे प्रवीण लिंगाडे, जानेफळ येथे शरद माळी, तर डोणगाव पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी गणेश इंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या व्यापक फेरबदलामुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















