सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज):सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील शेतकरी कैलास अर्जुन सानप (वय ४५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच कैलास सानप यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह मोठ्या आनंदात लावून दिला होता. तालुक्यातील उमरद येथे मुलीचा संसार थाटून दिल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, नियतीने घाला घातल्याने महिनाभरातच कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, शेतीतील वाढता उत्पादन खर्च, आर्थिक संकट आणि बँकेच्या कर्जामुळे कैलास सानप गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली होते. मुलीच्या लग्नाची जबाबदारी पूर्ण करूनही आर्थिक विवंचना कमी झाली नाही. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
कैलास सानप यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, विवाहित मुलगी, भाऊ व इतर नातेवाईक असा परिवार आहे. घरातील आधारवड निघून गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकरी व शेतकरी बांधवांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी आणि आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कैलास सानप यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच त्यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व शासकीय सहाय्य द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.













