वाशिम (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २७ जून रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत असून, दुपारी ३ वाजता ते शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात शेतकरी कर्जमुक्ती, राज्यातील राजकीय घडामोडी तसेच नुकत्याच पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या भूमिकेवर ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, संबंधित खासदारांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या वाशिम दौऱ्याला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर काय भाष्य करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















