डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) डोणगावपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील वाशीम जिल्ह्यातील पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ २४ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यातील एक आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक विष्णू वाघ (वय २४, रा. उकीरखेडा, ता. रिसोड, जि. वाशीम) याला १८ जून रोजी सायंकाळी जेवणासाठी बाहेर जाण्याचे सांगून पिंपरी सरहद्द येथील बळीराजा पेट्रोल पंपाजवळ नेण्यात आले. तेथे जुन्या वादाच्या कारणावरून जड हत्याराने डोक्याच्या मागील बाजूस वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर अपघात झाल्याचा बनाव केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी मृतकाचे वडील विष्णू गोविंदा वाघ (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद विनोद मवाळ, प्रतीक संतोष हुंबाड, पवन गजानन दांदडे (सर्व रा. महागाव, ता. रिसोड, जि. वाशीम) तसेच शुभम शेषराव अवचार (रा. अंजनी बु., ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सुमारे तीन वर्षांपूर्वी पैशाच्या व्यवहारातून वाद झाला होता. तसेच महिनाभरापूर्वी कामावर येण्याच्या कारणावरून धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. त्याच जुन्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
घटना शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द येथे घडली. फिर्यादीमध्ये संशयितांची नावे नमूद असल्याने शिरपूर पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इमरान खान पठाण करीत आहेत.













