Advertisement Advertisement

अवैध बायोडिझेल पंपावर राज्य दक्षता पथकाची धाड!मेहकर व सिंदखेड राजा परिसरात कारवाई; २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेलच्या विक्री व साठवणुकीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. मेहकर तालुक्यातील मोकळ्या जागेत तसेच सिंदखेड राजा येथील हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोर सुरू असलेल्या कथित अवैध बायोडिझेल पंपावर पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणी बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थाची अवैधरीत्या विक्री तसेच साठवणूक केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

ट्रकसह साहित्य ताब्यात…..

या कारवाईत बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा, अशोक लेलँड कंपनीचा मालमोटार ट्रक, भूमिगत लोखंडी टाकी, डिस्पेन्सर युनिट, पाइप व इतर साहित्य असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला पेट्रोलियम द्रव पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया….

अवैध बायोडिझेल विक्री व साठवणुकीप्रकरणी संबंधित मुख्य सूत्रधार आणि आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

या कारवाईत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश विजय बिजनावर, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरे यांच्यासह शिधावाटप निरीक्षक व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

अवैध इंधन विक्रेत्यांचे धाबे दणाणले….

जिल्ह्यात अवैध इंधनाची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांनी दिला आहे. या कारवाईमुळे अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या कारवायांकडे आता लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!