Advertisement Advertisement

अमरावतीत ‘क्रांतिकारी’ची जंबो बैठक; विदर्भ पिंजून काढण्याचा तुपकरांचा निर्धार!गावागावात संघटना उभी करणार; दुष्काळ, पीक विमा, कर्जमाफी, वीज प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाची तयारी…

अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरणारे शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आता विदर्भाच्या मैदानात संघटनात्मक ताकद वाढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. अमरावती येथे विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची जंबो बैठक घेत तुपकरांनी “प्रत्येक गावात क्रांतिकारींची ताकद उभी करा आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा”, असा स्पष्ट संदेश पदाधिकाऱ्यांना दिला. या बैठकीत केवळ संघटनात्मक आढावा घेण्यात आला नाही, तर आगामी काळातील शेतकरी आंदोलनाची दिशाही निश्चित करण्यात आली. दुष्काळ, नुकसानभरपाई, पीक विमा, पूर्णवेळ वीज, जळालेले ट्रान्सफॉर्मर, सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जदारांना दोन लाख रुपयांचे अनुदान आणि शेतकऱ्यांच्या सिबिल चा प्रश्न अशा ज्वलंत मुद्द्यांवर राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

‘क्रांतिकारी’मध्ये नवी इनिंग; अमित आढाऊंसह अनेकांचा प्रवेश…

अमरावतीचे शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आढाऊ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे अमरावतीसह विदर्भातील संघटनात्मक समीकरणात ‘क्रांतिकारी’ची ताकद वाढल्याचा दावा संघटनेने केला आहे.अमित आढाऊ यांच्यावर विदर्भ संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूर येथील ॲड. सृष्टीताई दौड यांची युवती आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षपदी, तर मनीष नांदे यांची वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. म्हणजेच अमरावतीच्या बैठकीत संघटनेच्या विस्ताराची केवळ घोषणा झाली नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष पदाधिकारी आणि जबाबदाऱ्यांची यंत्रणाही उभी करण्यात आली.

“पायाला भिंगरी लावा, गावागावात पोहोचा!”

बैठकीत बोलताना रविकांत तुपकरांनी संघटन विस्तारासाठी पदाधिकाऱ्यांना मैदानात उतरण्याचे आवाहन केले. गावागावात बैठका घ्या, तरुणांना चळवळीशी जोडा, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या आणि प्रत्येक गावात संघटनेची ताकद उभी करा, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. तुपकरांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी शेतकरी प्रश्नांवर झालेल्या आक्रमक आंदोलनांची पार्श्वभूमी पाहता, आता विदर्भात संघटनेची नव्याने बांधणी करून आगामी आंदोलन अधिक व्यापक करण्याची रणनीती आखली जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी….

विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी संकटात असल्याचा मुद्दा बैठकीत पुढे आला. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

त्याचबरोबर पीक विम्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा, जळालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे, सरसकट कर्जमाफी, नियमित कर्जदारांना दोन लाखांचे अनुदान आणि शेतकऱ्यांचा सिबिल चा प्रश्न यावरही सरकारला जाब विचारण्याची भूमिका घेण्यात आली.या प्रश्नांना घेऊन आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचे संकेत तुपकरांनी दिले आहेत. त्यामुळे अमरावतीतील ही बैठक पुढील शेतकरी आंदोलनाची पूर्वतयारी मानली जात आहे.

जिल्हानिहाय संघटन मजबूत करण्यावर भर…

बैठकीला वाशिम, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, अकोला, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, अमरावती आदी भागांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.ज्येष्ठ शेतकरी नेते गजाननभाऊ अमदाबादकर, प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, विदर्भ प्रमुख तथा देवळी नगराध्यक्ष किरण ठाकरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, पूर्व विदर्भ अध्यक्ष दयाल राऊत, युवा नेते सम्राट डोंगरदिवे यांच्यासह बुलडाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमरावती जिल्हाध्यक्ष स्वप्नील भुयार, संजय आपकाजे, वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे, अकोला जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, नागपूर जिल्हाध्यक्ष सागर दुधाने, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरसकार, भंडारा जिल्हाध्यक्ष सुरज निंबर्ते, चंद्रपूरचे प्रफुल्ल थेरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

‘पदवाटप’ नव्हे, आंदोलनाची नवी बांधणी!

अमरावतीतील बैठक ही केवळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी नव्हती, तर विदर्भात शेतकरी चळवळीची नवी संघटनात्मक फळी उभी करण्याचा आराखडा या बैठकीत मांडण्यात आला.

नव्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर संघटना मजबूत करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. तरुणांना मोठ्या प्रमाणावर चळवळीत सहभागी करून घेण्यासोबतच शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर तातडीने आवाज उठवण्यावर भर देण्यात आला. “पायाला भिंगरी लावून विदर्भ पिंजून काढायचा” आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्षाची धार आणखी तीव्र करायची, अशीच या बैठकीची भूमिका होती.

विदर्भातून आंदोलनाची नवी ठिणगी?

अमरावतीत झालेल्या या बैठकीनंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने विदर्भात संघटन विस्ताराचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. एकीकडे नव्या पदाधिकाऱ्यांची फळी, दुसरीकडे दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाची तयारी आणि त्यात तुपकरांची आक्रमक नेतृत्वशैली—या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने आगामी काळात राज्यातील शेतकरी आंदोलनाचे वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!