Advertisement Advertisement

आसमानी संकटात सुलतानी संकटाची भर; महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक!शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना, मंगरूळ फिडरवर विजेचा लपंडाव; संतप्त शेतकऱ्यांचा पॉवर हाऊसवर ठिय्या…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पावसाच्या लहरीपणामुळे आधीच दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची भर पडली आहे. शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना आणि मंगरूळ फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट पॉवर हाऊसवर धाव घेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

पावसाने ओढ दिल्याने शेतातील उभी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरी, बोअरवेल तसेच इतर जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पिकांना पाण्याची गरज असतानाच वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू असल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. वीज कधी येते आणि कधी जाते, याचा नेमच राहिलेला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

रात्री-अपरात्री शेतात जाण्याची वेळ….

वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे मोटारी सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागत आहे. वीज येण्याची वाट पाहत तासन्‌तास अंधारात बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. पावसाची अनिश्चितता आणि त्यात वीजपुरवठ्याचा लपंडाव यामुळे पिकांचे काय होणार, या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय नाही….

वारंवार वीज खंडित होत असल्याबाबत संबंधित लाईनमन, कनिष्ठ अभियंता तसेच उपविभागीय अभियंता यांच्याकडे शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, बिघाड झाल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यापलीकडे कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी पॉवर हाऊस गाठले.

पॉवर हाऊसवर ठिय्या; महावितरणच्या नावाने बोंब….

पॉवर हाऊसवर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महावितरणच्या नावाने बोंब मारत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

“आम्ही वीज मागतोय, उपकार नाही!” अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

“सहनशीलतेचा अंत झाला….

बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली आहेत. मात्र पावसाने साथ न दिल्याने पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

महावितरणने संबंधित फिडरची तातडीने पाहणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरूपी दूर करावेत, वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

“शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

आंदोलनात असंख्य शेतकरी सहभागी…..

या आंदोलनावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विजय परिहार, उद्धव चव्हाण, प्रकाश गवते, शिवा चव्हाण, भगवान परिहार, प्रमेश्वर सुरुशे, सागर परिहार, विष्णु परिहार, लक्ष्मण परिहार, अरुण परिहार, विकास चव्हाण, सुरेश पाटील, लक्ष्मण गावडे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही तर त्याचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसत नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे महावितरणने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!