बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तब्बल १८ वर्षांनंतर झालेल्या बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने दमदार कामगिरी करत २१ पैकी तब्बल १९ जागांवर विजय मिळविला. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज बुलडाणा येथे झालेल्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी गोविंद मिरगे हे सुद्धा बिनविरोध निवड करण्यात आली आहे…
डॉ. राजेंद्र शिंगणे यांची यापूर्वीच सिंदखेडराजा कृषी पतसंस्था मतदारसंघातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतर शिंगणे यांचा विजय निश्चित झाला होता.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच शिंगणे यांच्या सहकार पॅनेलचे पारडे जड होते. २१ पैकी १२ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या उर्वरित जागांच्या निवडणुकीतही सहकार पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवत १९ जागांवर विजय मिळविला.
या निकालामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील शिंगणे यांच्या नेतृत्वाची पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता अध्यक्षपदासाठी डॉ. शिंगणे यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. निवडणूक निकालानंतरही अध्यक्षपदासाठी पुन्हा डॉ. शिंगणे यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती.
विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या इतिहासात शिंगणे परिवाराचा सहकार क्षेत्रावर दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. त्यामुळे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे केवळ सहकार क्षेत्रातील घडामोड म्हणून नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाची घडामोड म्हणूनही पाहिले जात आहे.
डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. बँकेच्या कारभाराला अधिक सक्षम दिशा देणे, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा आणि आर्थिक सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे, तसेच बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर नव्या संचालक मंडळासमोर भर राहण्याची अपेक्षा आहे.
१८ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलचा दणदणीत विजय आणि आता अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड, यामुळे बुलडाणा जिल्हा बँकेच्या सहकारातील नेतृत्वावर पुन्हा एकदा शिंगणेंचा ठसा उमटला आहे.














