देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात मोठा बदल होऊन सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीत राहेरी बु. येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या दोघांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. तसेच अंढेरा परिसरात अनेक घरांवरील टिनपत्रे उडून झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले.
वीज पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू…!
सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु. येथे सोमवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. शेतातून मोटारसायकलवरून घरी परतत असताना दोन जणांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यात लक्ष्मीकांत भगवानराव देशमुख (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बालू रामलाल मगर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा!
देऊळगाव राजा शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत गारपीट झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे काही घरांचे स्लॅब हादरले, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
वादळी वाऱ्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्याने नागरिकांना अंधारात वेळ काढावी लागली. काही रस्त्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली नव्हती. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अंढेरा परिसरात घरांचे नुकसान, पिकांना फटका!
अंढेरा, पिंपरीआंधळे व परिसरातील अनेक गावांमध्ये दुपारनंतर अचानक हवामान बदलून वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून काही घरांची पडझड झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले.
अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतात पाणी साचले असून फळबागा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाचे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, तहसीलदार वैशाली डोंगरजाड यांनी अंढेरा फाटा परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.















