Advertisement Advertisement

EXCLUSIVE: दीड तपानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक; चिखलीच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचं लक्ष…”शिंगणे वर्चस्व राखणार की बोंद्रे-सावळे देणार टक्कर? जिल्हा बँक निवडणुकीची रंगली चर्चा!”

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): तब्बल दीड तपाच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक असली तरी तिच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, बदललेल्या राजकीय समीकरणांची खरी परीक्षा या निवडणुकीत होणार असल्याची चर्चा आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑगस्ट रोजी मतदान, तर २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, राजकीय वर्तुळात आतापासूनच मतांच्या गणितासह संभाव्य आघाड्या आणि गटबाजीच्या चर्चांना वेग आला आहे.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफूट, भाजप-काँग्रेसमधील बदललेली राजकीय समीकरणे आणि विधानसभा निवडणुकीनंतरचे वातावरण यामुळे यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची मानली जात आहे. सहकारातील वर्चस्व कोण टिकवणार आणि कोणाचा प्रभाव वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रमुख नेते एकत्र येऊन सर्वानुमते संचालक निवडण्याची परंपरा होती. त्यामुळे अनेकदा निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र, यंदाच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत ही परंपरा कायम राहते की प्रत्येक गट स्वतंत्रपणे मैदानात उतरतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सहकार क्षेत्रात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे अनेक वर्षांपासून मजबूत वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यंदाही त्यांचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, बदललेल्या राजकीय निष्ठा आणि नव्या समीकरणांमुळे यावेळी पूर्वीचे गणित कायम राहील, याची खात्री कोणीही देण्यास तयार नाही.

दुसरीकडे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि धृपदराव सावळे यांच्या गटाकडेही सहकारी संस्थांमधील प्रभावी मतदार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे. या गटाची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा सहकार आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकूणच, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडीपुरती मर्यादित न राहता, आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील ताकदीचा कस लावणारी ठरणार असल्याचे चित्र आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!