सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):”राजा उदार अन् बळीराजा बेजार” अशी परिस्थिती सध्या कृषी विभागाच्या कारभारामुळे संग्रामपूर तालुक्यात निर्माण झाली आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करूनही तब्बल १३८ शेतकरी अनुदानावरील मुंग व उडीद बियाण्यांपासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. महाबीजकडून बियाण्यांचा पुरवठाच न झाल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांना बियाणे मिळालेले नाही.
कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भर प्रमाणित बियाणे वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पाच वर्षांखालील बियाण्यांवर प्रतिकिलो ६० रुपये, तर पाच वर्षांवरील बियाण्यांवर प्रतिकिलो ३० रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात मुंग आणि उडीद बियाण्यांचा पुरवठाच झाला नसल्याने योजना कागदावरच राहिल्याची टीका होत आहे.
खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागवले होते. त्यामध्ये मुंगासाठी ६३ तर उडीदासाठी ७५, असे एकूण १३८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाइन अर्जांची छाननी करून विभागाने नियमानुसार लॉटरीदेखील काढली. प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा नियम असतानाही लाभार्थ्यांना बियाणे मिळाले नाही.
याशिवाय या हंगामात कडधान्य आत्मनिर्भर योजना, राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेलबिया पिकांची प्रात्यक्षिके, संकरित बियाणे तसेच भरड धान्य कार्यक्रमही सुरू करण्यात आला आहे. मात्र मुंग व उडीद बियाण्यांच्या पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांचा या योजनांवरील विश्वास डळमळीत होत आहे.
याबाबत तालुका कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता महाबीजकडून मुंग व उडीद बियाण्यांचा पुरवठा झालेला नसल्याने वाटप करता आले नाही, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बियाणे मिळूनही त्याचा उपयोग होणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.















