खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी सासुरवाडीला गेलेल्या जावयावर दोन साल्यांनी लोखंडी कडे व धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना खामगाव शहरात घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम सुरेश गुरुंग (वय ३२) हे २० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीला गेले होते. यावेळी पत्नीला घरी येण्याबाबत समजावून सांगत असताना त्यांचा साला अंकुश मोतीराम पहुरकर व योगेश मोतीराम पहुरकर यांच्याशी वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर योगेश पहुरकर याने हातातील लोखंडी कड्याने प्रेम गुरुंग यांच्या डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर अंकुश पहुरकर याने धारदार वस्तूने त्यांच्या पाठीवर वार करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी प्रेम सुरेश गुरुंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी अंकुश मोतीराम पहुरकर व योगेश मोतीराम पहुरकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३(५), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद कैलास शेळके करीत आहेत.













