मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बनावट कलर प्रिंट काढून त्यावर खोटी तारीख व शिक्का वापरत एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या बोराखेडी येथील २३ वर्षीय युवकाला प्रवासादरम्यान वाहकाने पकडले. शेख तनवीर शेख फारुख, रा. बोराखेडी असे संबंधित युवकाचे नाव असून, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भुसावळ आगाराचे वाहक महेंद्र एकनाथ पाटील, रा. अयोध्या नगर, भुसावळ यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. २० जुलै रोजी सकाळी ६ वाजता ते भुसावळ ते मेहकर बस क्रमांक एमएच ४०-एन ९८७६ वर कर्तव्यावर होते. सकाळी साडेनऊ वाजता बस मोताळा येथे पोहोचल्यानंतर बसस्थानकातून बाहेर पडत असताना मोताळा फाटा येथे त्यांनी शेख तनवीर याचा सवलतीचा बस पास तपासला. तपासणीदरम्यान पास संशयास्पद व बनावट असल्याचे आढळून आल्याने त्याला बुलडाणा आगारात नेण्यात आले.
बुलडाणा आगारातील कंट्रोलर मधुकर निकम यांनी पासची तपासणी केली असता, पास क्रमांक ००१-४३७८३२ असलेल्या ७०० रुपये मासिक शुल्काच्या पासवरील तारीख बदलून १३ जुलै २०२६ ते ११ ऑगस्ट २०२६ अशी खोटी तारीख टाकण्यात आल्याचे समोर आले. तसेच बनावट पासची कलर प्रिंट काढून शासनाची ७०० रुपयांची फसवणूक करून प्रवास केल्याचा आरोप आहे.
या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी शेख तनवीर शेख फारुख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३८, ३३६(३), ३४०(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोहेकॉ. अमोल खराडे करीत आहेत.














