शेगाव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका युवकाला बोलावून कड्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन विलास मदने (वय ३७, रा. जनक नगर, वरवट रोड, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रुपेश कैलास कुंडलकर (वय २८) व हनुमान कैलास कुंडलकर (वय ३२, दोघे रा. धनगर नगर, शेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, रुपेश कुंडलकर याने फिर्यादीला फोन करून, “माझा भाऊ तुझ्यासोबत आहे का?” अशी विचारणा केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन भेटण्यास सांगितले.
फिर्यादी चौकात पोहोचले असता तेथे रुपेश व हनुमान कुंडलकर दोघेही उपस्थित होते. फिर्यादीने “तुझा भाऊ तुझ्यासोबत असताना मला का बोलावले?” असा जाब विचारताच रुपेश याने शिवीगाळ करत हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या डोक्यावर व डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ वार करून जखमी केले. त्यानंतर हनुमान कुंडलकर यानेही चापटा व बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४३/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.













