Advertisement Advertisement

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्टला प्रारूप, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी…

बुलढाणा (जिमाका:बुलढाणा कव्हरेज न्यूज) : राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घराघरात जाऊन मतदार पडताळणी आणि गृहभेट मोहीम राबविणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेची कामेही पूर्ण केली जाणार आहेत.

यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि प्राप्त दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव समाविष्ट नसल्यास किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास निर्धारित कालावधीत आवश्यक प्रपत्र भरून निवडणूक प्रशासनाकडे सादर करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!