देऊळगाव राजा (बुलढाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा पोलिसांनी गिरोली बुद्रुक शिवारातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, अन्य तिघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास गिरोली बुद्रुक शिवारात काही व्यक्ती पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला.
या कारवाईत राजू साहेबराव लोखंडे (वय ३४, रा. माळीपुरा, देऊळगाव राजा) आणि भरत अवचित जाधव (वय ४०, रा. काचनेरा, ता. जाफ्राबाद) हे जुगार खेळताना आढळून आले. तर राजू लक्ष्मण नागरे (रा. राजीवळखेड), मच्छिंद्र केसापुरे आणि कैलास शिवरकर (दोघे रा. देऊळगाव राजा) हे पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील १ हजार १५० रुपये रोख, तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेले १ हजार ४५० रुपये, असा एकूण २ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आणि ५२ पत्त्यांचा एक संच जप्त केला.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळक यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.












