बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : पाच लाख रुपये आणि फ्लॅटची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फातिमा हलीमा सादिया यांनी भरोसा सेल, बुलढाणा येथे दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ होत असल्याचे नमूद केले आहे. विवाहानंतर सुरुवातीचे तीन ते चार महिने सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर सासू हलीमाबी बशीर शहा आणि सासरे बशीर शहा लुकमान शहा यांनी घरकामात चुका काढणे, टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, दीर शेहजाद शहा तसेच चुलत सासरे अन्वर शहा आणि मुनीर शहा हे पती शाहीन शहा बशीर शहा यांना फिर्यादीविरोधात सतत भडकवत होते. याशिवाय, फिर्यादीच्या वडिलांच्या मालकीचा देऊळगाव राजा येथील फ्लॅट पतीच्या नावावर करून देण्याची आणि व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न केल्यामुळे फिर्यादीला शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच, फिर्यादी व तिच्या नातेवाईकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अखेरीस फिर्यादीच्या भावाला फोन करून “बहिणीला घेऊन जा” असे सांगत तिला घर सोडण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी शाहीन शहा बशीर शहा (पती), बशीर शहा लुकमान शहा (सासरे), हलीमाबी बशीर शहा (सासू), शेहजाद शहा बशीर शहा (दीर), अन्वर शहा लुकमान शहा आणि मुनीर शहा (चुलत सासरे), सर्व रा. इंदिरा नगर, बुलढाणा यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नागरे करीत आहेत.












