शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : संत नगरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव शहरात महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेल मालकाने महिलेचे खासगी फोटो व व्हिडिओ चोरून काढत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील खामगाव मार्गावरील एका हॉटेलमध्ये पीडित महिला कर्मचारी म्हणून काम करत होती. काही दिवसांपूर्वी महिला अंघोळ करत असताना आरोपी हॉटेल मालकाने तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये चोरून रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर दबाव टाकला.
बदनामीच्या भीतीमुळे पीडित महिला सुरुवातीला गप्प राहिली. मात्र आरोपीने याचाच गैरफायदा घेत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
अखेर छळ असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये बेकायदेशीररीत्या फोटो व व्हिडिओ काढणे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संतनगरी शेगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.













