Advertisement Advertisement

मजुरीच्या शोधात कुटुंब आलं मोताळ्यात; ओळखीचा फायदा घेत नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, गर्भधारणेनंतर काळं कृत्य उघड!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मजुरीसाठी दुसऱ्या राज्यातून मोताळा तालुक्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर या गंभीर प्रकाराला वाचा फुटली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी राजरत्न ऊर्फ गोविंदा पंडित आमले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंबीय रोजगार आणि मजुरीच्या शोधात दुसऱ्या राज्यातून मोताळा तालुक्यातील एका गावात आले होते. गावातील ढाब्याजवळ ते वास्तव्यास होते. याच परिसरात अमरावती जिल्ह्यातील कसबे गव्हाण येथील राजरत्न आमले हा देखील राहत होता. एकाच परिसरात राहण्यामुळे आरोपीची पीडितेच्या कुटुंबीयांशी ओळख झाली होती.

याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने १० जानेवारी ते ३० मार्च २०२६ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. काम संपल्यानंतर दोन्ही कुटुंबे आपापल्या गावी परतली. मात्र, काही काळानंतर पीडित मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आणि हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात अप. क्र. ५३१/२०२६ अन्वये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(स) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलीशी संबंधित या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!