चांडोळ(बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील चांडोळ येथील प्रसिद्ध आठवडी बाजारात शनिवारी (५ जुलै) झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबून चिखलाचे साम्राज्य पसरले. त्यामुळे बाजारात आलेले विक्रेते आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी पायवाटा चिखलाने भरल्याने ये-जा करणेही कठीण झाले.
तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या चांडोळचा आठवडी बाजार विदर्भासह मराठवाड्यातही प्रसिद्ध आहे. परिसरातील अनेक गावांतील नागरिक दर आठवड्याला या बाजारात विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येतात. मात्र, शनिवारी झालेल्या पावसामुळे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि चिखल निर्माण झाला.
या परिस्थितीचा थेट परिणाम विक्रेत्यांच्या व्यवसायावर झाला. चिखल आणि पाण्यामुळे ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली, तर काही विक्रेत्यांचे साहित्यही पावसाच्या पाण्यामुळे खराब झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचे दिसून आले.
दरवर्षी पावसाळ्यात बाजार परिसरात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप विक्रेते व ग्रामस्थांनी केला आहे. बाजार परिसरातील पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच भविष्यात कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
















