Advertisement Advertisement

रायपूर–पाचला रस्त्यामुळे शेतात पाणी तुंबले; पेरणीचे नुकसान, उपाय न झाल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा…

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): रायपूर–पाचला गावजोड रस्त्याच्या कामादरम्यान नैसर्गिक पाण्याचा निचरा बंद झाल्याने परिसरातील शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचून नुकत्याच झालेल्या पेरणीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा १० ते १५ शेतकऱ्यांनी दिला आहे.

. जाहिरात 👆

शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये सुरू झालेल्या रायपूर–पाचला गावजोड रस्त्याच्या कामादरम्यान रस्त्यालगतचा नैसर्गिक पाण्याचा निचरा माती व दगड टाकून बंद करण्यात आला. परिणामी, पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये साचून अनेक एकर शेती जलमय झाली असून नुकत्याच झालेल्या पेरणीचे मोठे नुकसान झाले आहे.

यापूर्वी या समस्येची दखल घेत निवासी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला क्रॉसिंग पाईप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाईप बसविण्यातही आले; मात्र मे २०२६ मध्ये काही व्यक्तींनी ते पाईप पुन्हा माती व दगड टाकून बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या प्रकाराबाबत मे महिन्यापासून प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही नाली खुली करण्यासाठी कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, तातडीने निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनासह आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!