Advertisement Advertisement

“पाऊस कोसळतोय… पण धरणं अजूनही तहानलेली! बुलढाण्यातील जलसाठ्याची चिंताजनक स्थिती! “मोठ्या धरणांत केवळ २६.४७ टक्के जलसाठा; खडकपूर्णा अजूनही कोरडे….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असली, तरी धरणांमधील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. पावसाळ्याचा एक महिना उलटूनही तीन मोठे, सात मध्यम आणि ४९ लघु प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणी साठले नसल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाबाबत चिंता कायम आहे.

सध्या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये २६.४७ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये १२.८६ टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये अवघा १२ टक्के जलसाठा आहे. यंदा अद्याप प्रमुख नद्यांना पूर न आल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक मर्यादित राहिली आहे.

बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव (स्व. रामसिंग देवसिंग भोयर) जलाशयात केवळ ३.१७० दलघमी (२५.५६ टक्के) जलसाठा असून तो मृतसाठ्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे शहरासह परिसरातील गावांना खडकपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र खडकपूर्णा धरणात अद्याप शून्य टक्के जलसाठा असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.

मोठ्या प्रकल्पांमध्ये नळगंगा धरणात ५१.४९ टक्के, तर पेनटाकळी धरणात ३८.७६ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ज्ञानगंगा (४५.०३%), उतावळी (४२.७०%) आणि कोराडी (४०.६१%) या धरणांमध्ये तुलनेने समाधानकारक पाणी आहे. तर मस (२६.४०%), मन (२४.२७%), तोरणा (१३.४३%) आणि पलढग (११.७२%) प्रकल्पांतील जलसाठा कमी आहे.

गतवर्षी याच काळात बहुतांश धरणे भरली होती. मात्र यंदा जून महिन्यात पाऊस उशिरा सुरू झाल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. आता येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यासच धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची आशा आहे. अन्यथा जिल्ह्यासमोर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!