पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शिक्षण क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि पालकांचा खाजगी शाळांकडे वाढलेला ओढा लक्षात घेऊन अंढेरा केंद्रांतर्गत पाडळी शिंदे येथील जिल्हा परिषद शाळेने यंदाच्या शैक्षणिक सत्रात एक आदर्श पाऊल उचलले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शिक्षकांनी एकसमान ड्रेस कोड परिधान करून गळ्यात ओळखपत्र लावले. विशेष म्हणजे, वर्गावर जाण्यापूर्वी सर्व शिक्षकांनी आपले मोबाईल फोन शाळेच्या कार्यालयात जमा ठेवून विद्यार्थ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा परिषद शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या आणि खाजगी शाळांकडे वाढणारा कल लक्षात घेता, शाळेचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःपासून बदलाची सुरुवात केली आहे. शिस्त, वेळेचे नियोजन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यावर भर देत विद्यार्थी व पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ही संकल्पना केवळ औपचारिक नसून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांचे संपूर्ण लक्ष अध्यापनावर राहावे आणि शाळेची सकारात्मक प्रतिमा निर्माण व्हावी, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पाडळी शिंदे येथील हा उपक्रम तालुक्यातील इतर जिल्हा परिषद शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
दरम्यान, देऊळगाव राजा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मुसुदवाले यांनी गतवर्षी शाळांमध्ये अध्यापनावेळी मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार शिक्षकांनी मोबाईल कार्यालयात जमा ठेवूनच वर्गावर जाण्याचे निर्देश देण्यात आले होते. यंदाही पाडळी शिंदे येथील शाळेत या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तालुक्यातील इतर शाळांनीही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.














