बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे सकारात्मक चित्र चिखली तालुक्यातील मलगी येथे पाहायला मिळाले आहे. जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, मलगी (ता. चिखली) येथे तब्बल १५ विद्यार्थ्यांनी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला आहे. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांचा वाढता विश्वास हा शासकीय शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदलाचे प्रतीक मानला जात आहे. डिजिटल वर्गखोल्या, आधुनिक अध्यापन पद्धती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षकांची सातत्यपूर्ण मेहनत यामुळे पालक पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळत आहेत. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील वाढत्या शुल्कालाही पर्याय म्हणून अनेक पालकांनी मलगी येथील जि.प. शाळेची निवड केली आहे.
याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यातील शिक्षक प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मलगी येथील शाळेत १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची घटना ही त्या प्रयत्नांचे यशस्वी फलित असून, जिल्ह्यातील शासकीय शिक्षणावरील वाढत्या विश्वासाची नोंद आहे.
दरम्यान, मलगी येथील शिक्षकांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, ग्रामीण भागातील शासकीय शाळांसाठी ही प्रेरणादायी बाब ठरत आहे.













