बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील रुईखेड–मायंबा परिसरात २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आणि रुईखेड येथील पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते डायव्हर्शन पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे भडगाव–चिखली मार्गावरील वाहतूक तब्बल चार ते पाच तास पूर्णपणे ठप्प झाली.
रुईखेड येथे नवीन पुलाचे काम सुरू असल्याने वाहनांच्या ये-जा करण्यासाठी बाजूला तात्पुरता पर्यायी रस्ता (डायव्हर्शन) तयार करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि पुराच्या प्रवाहात हे डायव्हर्शन वाहून गेले. परिणामी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
रस्ता बंद झाल्याने वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना तासनतास वाट पाहावी लागली, तर काही महिलांना पुलाजवळील लोखंडी अँगलचा आधार घेत जीव धोक्यात घालून पूरग्रस्त भाग ओलांडावा लागला. अनेक वाहनांनी अखेर परतीचा मार्ग स्वीकारत धाडमार्गे चिखलीकडे वळसा घेतला.
दरम्यान, या रस्त्याच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने सुमारे ३११ कोटी ६५ लाख रुपयांची कामे सुरू आहेत. मात्र, पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नियोजनातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.














