चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयात युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी गुरुवारी अचानक ठिय्या आंदोलन छेडल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, तहसील कार्यालयात जनता दरबार सुरू असतानाच हे आंदोलन सुरू झाल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या शेती मोजणीचे प्रस्ताव प्रलंबित असून, वारंवार पाठपुरावा करूनही केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी संतोष भुतेकर यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी थेट भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतमोजणीसाठी वेळेत कर्मचारी येत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनादरम्यान भुतेकर यांनी काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले. “काही कर्मचारी शेतकऱ्यांच्या गटात वाद निर्माण करून येतात, तर काही ठिकाणी चुकीची मोजणी केली जाते. शेतमोजणीसाठी जाणारे कर्मचारी दारू किंवा भांग सेवन करून येतात काय?” असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत भूमी अभिलेख कार्यालय सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते.
अखेर आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. प्रलंबित शेतमोजणीच्या प्रकरणांना निश्चित तारखा देण्यात आल्या तसेच संबंधित शेतकऱ्यांची मोजणी तात्काळ करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर संतोष भुतेकर यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. त्यामुळे जवळपास एक तास सुरू असलेले हे आंदोलन अखेर सकारात्मक तोडग्याने संपुष्टात आले.













