Advertisement Advertisement

दीड वर्षांपासून एसटी बंद; ९० विद्यार्थ्यांची मेहकर आगारातच भरली शाळा…

डोणगाव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मेहकर तालुक्यातील कंबरखेड–गौंढाळा एसटी बसफेरी मागील दीड वर्षांपासून बंद असल्याने शिक्षणासाठी मेहकरला जाणाऱ्या सुमारे ९० विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. बससेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी १३ जुलै रोजी मेहकर एसटी आगारातच शाळा भरवून आंदोलन केले.

मेहकर ते गौंढाळा हा सुमारे ११ किलोमीटरचा मार्ग असून या मार्गावरील साबरा फाटा, कंबरखेड आणि गौंढाळा या गावांतील विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मेहकर येथे ये-जा करतात. मात्र, बसफेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पालकांवर आर्थिक भार वाढला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

बसफेरी तातडीने पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांसह मेहकर आगारात आंदोलन करत प्रतीकात्मक शाळा भरविली. आंदोलनाची दखल घेत आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक-दोन दिवसांत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या सर्वेअरने मेहकर–गौंढाळा मार्गाची पाहणी केली. गौंढाळा गावाजवळील पुलालगत भराव टाकण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत ग्रामपंचायतीला सूचना करण्यात आल्या आहेत. रस्ता सुस्थितीत झाल्यानंतर या मार्गावर एसटी बसफेरी सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक नियंत्रक समाधान सोनवणे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!