देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील शहीद अब्दुल हमीद चौक परिसर गुरुवारी (८ मे) सकाळी भीषण आगीच्या दुर्घटनेने हादरला. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण करत पाच दुकाने भस्मसात केली. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे शहरात प्रचंड उकाडा जाणवत असतानाच बाजारपेठेतील भरकादेवी आईस्क्रीमसह अन्य चार दुकानांमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला एका दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतले.
आगीचे प्रचंड लोळ आणि आकाशात पसरलेला काळाकुट्ट धूर दूरवरूनही दिसत होता. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांतील साहित्य बाहेर काढण्यासाठी धावपळ केली. काहींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग विझविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, आगीची तीव्रता इतकी मोठी होती की दुकानांतील फर्निचर, विद्युत उपकरणे, खाद्यपदार्थ व इतर साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची दोन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे कर्मचारी, नगर परिषद प्रशासन, पोलीस विभाग तसेच स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम केले. काही काळ बाजारपेठ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या आगीत नेमके किती नुकसान झाले याचा पंचनामा प्रशासनाकडून सुरू असून, प्रभावित व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विद्युत उपकरणांचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













