खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव येथील एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ५० लाख ८७ हजार २०१ रुपये किमतीचा रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे. मेसर्स अॅम ऑईल्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनावर २८ सप्टेंबर रोजी टाकलेल्या छाप्यात तब्बल २ लाख ४८ हजार ८४५.४०० किलो तेलाचा साठा आढळून आला. या कारवाईमुळे खामगावच्या औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
खामगाव एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ए-१३ ते ए-१४ आणि ए-१८ येथे असलेल्या या आस्थापनाची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा आढळून आला. या तेलाचा दर्जा निर्धारित अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता निकषांनुसार आहे की नाही, याबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने साठा जप्त करण्याची कारवाई केली.
दरम्यान, आस्थापनातील लूज रिफाइंड सोयाबीन तेलाचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच तेलाच्या गुणवत्तेबाबत स्पष्टता येणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित आस्थापनाकडे व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवानाही नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तेलाच्या गुणवत्तेनुसार आणि तपासणीत आढळलेल्या त्रुटींनुसार संबंधित आस्थापनाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त पी. एस. पाटील (बुलढाणा) आणि सहआयुक्त एस. डी. केदारे (अन्न व औषध प्रशासन विभाग, अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सुरक्षा अधिकारी जी. के. आणि अन्न सुरक्षा अधिकारी एस. ए. सूर्यवंशी (इंटेलिजन्स ब्युरो, अमरावती) यांनी सहभाग घेतला.
















