Advertisement Advertisement

झेरॉक्स आणायला जातो म्हणत रूममधून बाहेर पडला, पण परतलाच नाही! रात्रभर शोधाशोध, सकाळी धरणगावच्या शेतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मलकापूर शहरातील व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. चिखली तालुक्यातील पांढरदेव येथील समाधान सुनील म्हस्के (रा. पांढरदेव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धरणगावजवळील शेतात त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

समाधान हा मलकापूर येथील व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय सत्रात शिक्षण घेत होता. तो मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील गजानन नगरी येथे मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वर्गमित्राची दुचाकी घेऊन झेरॉक्स आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खोलीतून बाहेर पडला. मात्र, रात्री दहापर्यंत तो परतला नसल्याने त्याच्या मित्रांनी आई-वडिलांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर रात्रभर मित्रांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील सुनील म्हस्के आणि मामा मलकापूर येथे पोहोचले. त्यांनी महाविद्यालय परिसरासह शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी समाधान सायंकाळी महाविद्यालयासमोरून धरणगावच्या दिशेने जाताना दिसून आला. पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धरणगाव ढाब्याजवळ त्याने नेलेली दुचाकी उभी असल्याचे आढळले. परिसरातील शेतात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश बेले यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अनिल खर्चे, युगेश खर्चे आणि माजी नगरसेवक गजानन सोनोने यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे समाधानच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!